संध्याकाळचा चहा

साहित्य :
माणशी अर्धा कप पाणी,
पाण्याएवढं दूध,
जेवढे कप तेवढे चमचे साखर. आणिक वरून जराशी.
साखरेच्या निम्मा चहा,
चहाइतकं किसलेलं आलं (आलं चेचून घालणं अमान्य आहे),
आणि मिळेल तेवढं ऊन.

कृती :
गॅससमोरची खिडकी उघडून संध्याकाळचं सोनेरी ऊन आत येऊ द्या.
पाणी एका पातेल्यात मंद आचेवर ठेवा. वाढत्या अंगाचं समजून जरा मोठं पातेलं घ्या. झोपेनंतरचा आळस त्यात पडल्यावर पाणी सांडायला नको.  
पाणी गरम होता होताच आलं घाला. म्हणजे कसं - दोघांना एकमेकांची सवय झाली पाहिजे. एकदम लग्न करा म्हटलं तर कसं चालेल?
जरा उकळी आली की साखर घाला. भरपूर ढवळा. साखर संपूर्ण विरघळल्यावर आपलं नाक पातेल्याजवळ नेऊन दीर्घ श्वास घ्या. आपोआप चेहऱ्यावर हसू नाही आलं तर काहीतरी चुकलंय असं समजा.
पाणी उकळताना आळसाची वाफ होतेय की नाही यावर लक्ष ठेवा, कारण -
चहापत्ती चमच्यातून उकळत्या पाण्यात पडण्याचा आवाज म्हणजेच तरतरी.
उकळीचा आवाज म्हणजे उत्कंठा. अति होऊ नये म्हणून दूध घाला आणि तिची उत्सुकता करा. मंद आचेवर दूध गरम होईल एवढंच उकळा आणि गॅस बंद करा.
चहा कपात गाळताना तुमच्या कदाचित लक्षात येईल की, चहाचा रंग साधारण आपल्या त्वचेच्या रंगासारखा आहे! चहा आपलाच एक भाग आहे? आपला नाही तर ज्याने प्रेमाने केला त्या/तिचा?
असो. तुम्ही आरामखुर्चीत बसून पुस्तकाचं पान उलटा आणि पहिला घोट घ्या.

Comments

Popular Posts