गच्ची

त्याचं कसं आहे ना,
माझ्यासारख्या लोकांना की नई
पाय मोकळे करायचे असतात,
हालचाल करायची असते,
वारं खायचं असतं,
पण खाली उतरायचं नसतं.
आकाशाकडे टक लावून
पक्ष्यांना सूर्यास्ताच्या वेळी
घरी जाताना बघायचं असतं.
समोर सूर्य खाली जायच्या आतच
मागून चंद्र उगवताना पहायचं असतं,
ते पाहताना भूप गायचा असतो
पण कोणाला ऐकवायचा नसतो.
घराच्या चार भिंतींमध्ये प्रायव्हसी नाही
ती खुल्या आभाळाखाली,
मोगरा, गुलाब आणि
चाफ्याच्या झाडांच्या मध्ये मिळते.
म्हणून जेव्हा बाहेर न जाता
घराबाहेर पडायचं असतं,
तेव्हा गच्चीत जायचं असतं.

Comments

Popular Posts